ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान: महामार्गावरील खर्डी गावच्या श्री सोनाई सीताई देवीचा यात्रात्सव: ( १४ एप्रिल ते अक्षय तृतीया १९ एप्रिल पर्यंत )
ठाणे जिल्ह्याचे श्रद्धास्थान: महामार्गावरील खर्डी गावच्या श्री सोनाई सीताई देवीचा अद्भूत( १४ एप्रिल ते अक्षय तृतीया १९ एप्रिल पर्यंत ) यात्रात्सव:
संकलन - प्रा.संजय फाकटकर
ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक नॅशनल हायवेवर ( क्र.३ ) वसलेले खर्डी गाव सध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. हजारो भाविकांची नितांत श्रद्धा असलेले आणि ऐतिहासिक वारसा जपणारे श्री सोनाई सीताई देवीचे मंदिर भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटरवर हे मंदिर असून मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करताना खर्डी हे महत्त्वाचे ठिकाण लागते. खर्डी रेल्वे स्थानकापासून सुमारे दो किलोमीटर अंतरावर देवीचे हे भव्य मंदिर आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिरात दरवर्षी हजारो भक्त देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात.
शिरोळ ते खर्डी: देवीच्या आगमनाचा इतिहास:
सुमारे १८५ वर्षांपूर्वी देवीचे मूळ स्थान शिरोळ येथील गोपाळपाड्यावर होते. खर्डी येथील भिका झनकर यांना देवीने स्वप्नात दृष्टांत देऊन खर्डीत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात देवीला खर्डीत आणले आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तिची स्थापना केली. आजही शिरोळ येथील त्या मूळ शिळेवर वाघावर आरुढ झालेली देवीची प्रतिमा पाहायला मिळते.
मंदिराचे वैशिष्ट्य आणि मोहक रूप:
मंदिराच्या गाभाऱ्यात देवीचे दोन अत्यंत सुंदर मुखवटे आहेत.
पहिल्या मुखवट्यात बालसुलभ निरागसता आणि कुतूहल जाणवते.
दुसऱ्या मुखवट्यात शांतता, प्रगल्भता आणि मातृत्वाचे वात्सल्य ओथंबलेले दिसते.
देवीचे शेंदरी रंगाचे भव्य रूप, कपाळावरची चंद्रकोर आणि चांदीचा मुकुट पाहून भक्तांचे मन प्रसन्न होते.
पाच दिवसांचा 'बोहाडा' यात्रात्सव:
खर्डीत अक्षय्य तृतीयेनिमित्त होणारा 'बोहाडा' (लळित) हा उत्सव ठाणे जिल्ह्यात विशेष प्रसिद्ध आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध पौराणिक पात्रांचे सादरीकरण केले जाते: पहिल्या दिवशी प्रथम पाटलाच्या घरापुढे मांडव घातला जातो. रात्री मानाची घराणी अधिकारी (देशमुख मराठा) यांचे दारात गावातले मानकरी शिंदे (काळण), बेदरकर / फाकटकर/ निगुजकर (सोनार), मुळे (ब्राह्मण) या सर्वांना प्रमुख मांडवात उभं केलं जातं. प्रत्येकाच्या हातात तलवार देऊन त्याची मिरवणूक वाद्यांच्या तालावर नाचणाऱ्या मुलांसह मंदिरात नेली जाते. विविध देवांची पात्रे: गणपती, सरस्वती, काळभैरव, खंडेराव आणि एकादशी अशा विविध देवतांची पात्रे ( मुखवटे ) घालून वाजत-गाजत काढली जातात.
●असुरांचा संहार: राम-लक्ष्मण आणि रावण युद्ध, तसेच नरसिंह अवतार व हिरण्यकशिपू वध असे थरारक प्रसंग सादर केले जातात.
● अक्षय्य तृतीयेचा मुख्य सोहळ्यास: या दिवशी देवीचे पात्र घेतलेल्या पात्राच्या मस्तकावर प्रत्यक्ष श्रीसानाई सीताई देवीचा मुखवटा ठेवून तिची भव्य मिरवणूक काढली जाते.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या यात्रेत ग्रामीण संस्कृती आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. खर्डीची श्री सोनाई सीताई देवी समस्त ठाणे जिल्ह्याचे एक जागृत आणि चैतन्यमय श्रद्धास्थान बनली आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा